मनपाचा मास्टर प्लॅन...! पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण

Foto
 कचरा कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने आता वार्ड वार्डात दहा टनाचे ड्रायवेस्ट प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला असून मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या समोर योजनेचे सादरीकरण केले.
 जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार अंबादास दानवे यांच्यासह मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मनपा आयुक्त पांडे यांनी मनपाच्या शंभर कोटींचे रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सांडपाणी प्रकल्प, स्व.बाळासाहेब ठाकरे उद्यान, अमृत योजना, बेटांचे सौंदर्यीकरण, क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे यासह  विविध योजनांचे पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण केले. शंभर कोटींच्या ३६ किमी रस्त्यांपैकी ३१ किलोमीटरचे रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहेत. उर्वरित रस्त्यांचे काम महिनाभरात पूर्ण होईल असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. सातारा देवळाईतील विविध योजना, स्मार्ट सिटी बस संख्या वाढविणे त्याचबरोबर बस डेपो संदर्भातही चर्चा करण्यात आली. सफारी पार्क तसेच ई गव्हर्नन्स द्वारे शहरातील मालमत्ता कराची वसुली याबाबतही पालकमंत्र्यांना माहिती सादर करण्यात आली. शहरातील प्रधानमंत्री आवास  योजनेत तिसगाव येथे पंधरा हजार नागरिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याच बरोबर रामनगर कांचनवाडी यासह इतर भागात आवास योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर पालकमंत्र्यांनी राज्य सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले. प्रत्येक वॉर्डात उभारणार प्लांट 
शहरातील कचरा कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगर पालिकेने आता मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार ३०० टनाचे मोठे प्लांट उभारण्यात येणार आहेत. तर प्रत्येक वार्डात १० टनाचा ड्राय वेस्ट प्लांट उभारण्यात येणार असून पालकमंत्र्यांचा समोर या योजनेचे सादरीकरण करण्यात आले. या मूळे शहरातील कचरा कोंडीची समस्या राहणार नाही, असा दावाही आयुक्तांनी यावेळी केला.